लस निर्मिती : हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीला केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा ! … तर अवघ्या दोन महिन्यांत लस व औषध उत्पादन होणार सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २८ मे । पिंपरी-चिंचवडमधील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीमध्ये कोरोना प्रतिबंध लस निर्मिती करण्याबाबत आर्थिक तजवीज झाली आहे. आता प्रतीक्षा केंद्र सरकारच्या परवानगीची आहे. रेमडीसेवीर इंजेक्शन, ब्लॅक फंगस औषधही कंपनीत निर्माण करण्यात येणार आहे. केंद्राने परवानगी दिल्यास अवघ्या दोन महिन्यात लस उत्पादन सुरू होईल, असा विश्वास कंपनीचे अध्यक्ष आणि खासदार मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे.

कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीकरीता एचए कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिका आर्थिक मदत करणार आहे. त्याअनुशंगाने पुण्यामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी कंपनीच्या कामगार युनियनचे अध्यक्ष आणि खासदार मनोज कोटक, पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक नीरजा सराफ उपस्थित होत्या.

खासदार कोटक म्हणाले की, एचए कंपनीत लस निर्मितीच्या परवानगीसाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. केंद्र सरकारकडून या प्रस्तावावर औषध व रसायन विभागाचे सहसचिव एच. के. हाजोंग यांनी आवलोकन केले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत परवानी द्यावी, अशी चर्चा केंद्रीय रसायन व औषध निर्माण राज्य मंत्री मनसुख मांडवीय आणि औषध व रसायन विभागाचे सहसचिव एच. के. हाजोंग यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली आहे. आम्ही प्रस्तावासाठी पायाभूत सुविधांचा पाठपुरावा करणार आहोत. त्याचा अंमलबजावनीने लोकांना दिलासा मिळेल, अशी भूमिका कोटक यांनी मांडली.

कोरोनाची आता तिसरी लाट येणार आहे. त्यामध्ये लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर एचए कंपनीत लहान मुलांसाठी म्हणजेच १ ते १८ वर्षे वयोगटासाठी फायझर लस निर्मितीचीही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. तसेच, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक या दोन लसींचे उत्पादनही करण्यात येणार आहे. लस उत्पादनाची प्रतिदिन क्षमता ५ लाख इतकी असणार आहे. परवानी मिळाल्यानंतर दोन महिन्यांमध्ये लस निर्मितीस सुरूवात होईल, असेही खासदार कोटक यांनी म्हटले आहे.

एचए कंपनीमध्ये लस निर्मितीकरिता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह एचए कामगार युनियनचे अध्यक्ष खासदार मनोज कोटक केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. कंपनीच्या मागणीनुसार पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कंपनीला आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. स्थायी समितीमध्ये तसा प्रस्ताव मंजुरही केला आहे. लस उत्पादन सुरू झाल्यानंतर वितरणासाठी पहिले प्राधान्य हे पिंपरी-चिंचवडसाठी राहणार आहे. त्यासाठी आम्ही आग्रही आहोत. शहरातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लस बाहेर पाठवावी, अशा अटीने महापालिका प्रशासन कंपनीसोबत करार करणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *