महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २९ मे । पंजाब नॅशनल बँकेला कोटय़वधी रुपयांचा चुना लावून भारतातुन पसार झालेल्या मेहुल चोक्सीला मंगळवारी डोमिनिकामध्ये बेडय़ा ठोकण्यात आल्या. यानंतर त्याला भारताच्या ताब्यात देण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले होते. मात्र, डोमिनिका कोर्टाने चोक्सीच्या प्रत्यार्पणावर स्थगिती आणली आहे.
पीएनबी बँकेतील तब्बल 13 हजार 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी, फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी भारता तून फरार झाल्यानंतर अँटिग्वा आणि बारबुडाचं नागरिकत्व घेऊन स्थायिक झाला होता. चोक्सीला बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी नुकतीच डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली. यानंतर त्याच थेट भारता कडे प्रत्यार्पण व्हावं यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले होते. यादरम्यान अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊने यांनी चोक्सीचं थेट भारताच्या ताब्यात द्या, अशी सूचना डोमिनिका सरकारला केली होती. मात्र, डोमिनिका कोर्टाने कोर्टाने पुढील आदेशापर्यंत मेहुल चोक्सीचं प्रत्यार्पण केलं जाऊ नये असा आदेश दिला आहे. चोक्सीला अटक झाल्यावर त्याच्या वकिलांकडून हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे.
याचिकेमध्ये वकिलांनी मेहुल चोक्सीचा छळ करण्यात आला असून त्याच्या शरीरावर जखमा असल्याचा दावा केला आहे. तसेच मेहुल चोक्सीचे अँटिग्वा आणि बारबुडामधून अपहरण करण्यात आले असा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे.
अँटिग्वा आणि बारबुडाचे नागरिकत्व मिळताच मेहुल चोक्सीने भारतीय नागरिकता रद्द केली आहे. इमिग्रेशन आणि पासपोर्ट कायद्याप्रमाणे त्याचे फक्त अँटिग्वामध्येच प्रत्यार्पण केले जाऊ शकतं, असा दावा चोक्सीच्या वकिलांकडून केला जात आहे.