वाहनांची रांग 100 मी.पेक्षा जास्त झाल्यास, नाही द्यावा लागणार कर; टाेल प्लाझावरील प्रतीक्षा कमी करण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २९ मे । देशभरातील टाेल नाक्यांवरील वाहनांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार टोल नाक्यांवरील वाहनांची रांग १०० मीटरपेक्षा जास्त असल्यास त्यांच्याकडून टोल आकारला जाणार नाही. याव्यतिरिक्त, प्रत्येक वाहनाला १० सेकंदांच्या आत सेवा देणे आवश्यक असेल. एनएचआय म्हणाले, “फास्टॅगमुळे बहुतांश टोल नाक्यांवर प्रतीक्षा करावी लागत नाही, परंतु काही कारणास्तव जर रांग १०० मीटरपेक्षा जास्त असेल तर सर्व वाहनांना टोल न देता जाण्याची परवानगी देण्यात येईल. वाहनांची रांग १०० मीटरच्या आत येईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. याची अंमलबजावणी करण्यासाठी टाेल नाक्यावर १०० मीटर अंतरावर पिवळी रेषा आखण्यात येईल.

इलेक्ट्राॅनिक टाेल संकलनाचा विचार करता पुढील १० वर्षांतील वाहतुकीच्या दृष्टीने याेजना तयार करण्यात येत आहे. टाेल संकलन अधिक सक्षम करण्यासाठी टाेल प्लाझांची रचना आणि निर्मितीवर भर देण्यात येईल, असे एनएचआयने म्हटले आहे.

कोरोना काळातील नियमांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग महत्त्वाचा नियम झाला आहे. फास्टॅगच्या वापरामुळे त्याचे अनुसरणही सहजपणे हाेत आहे. त्यामुळे टाेल नाका चालवणारे आणि वाहनातील प्रवासी यांच्यात संपर्क हाेऊ शकत नाही.

एनएचआयएच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी २०२१ पासून आतापर्यंत १०० % राेकडरहित टाेलिंग झाले आहे. एनएचएआयच्या टोल नाक्यांवर फास्टॅगची एकूण उपलब्धता ९६ % आणि बऱ्याच ठिकाणी ९९% पर्यंत पोहोचली आहे. महामार्गाच्या युजर्सकडून फास्टॅगचा वापर वाढल्यामुळे टाेल नाक्यांच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता आणण्यास मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *