महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २९ मे ।रशियाची स्पुटनिक-व्ही ही लस जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशभरात व्यापक वापरासाठी उपलब्ध होईल. तथापि, मेच्या पहिल्या आठवड्यापासूनच तिचे डोस दिले जात आहेत. पण उपलब्धता पुरेशी नसल्याने तिचा मर्यादित वापर होत आहे.
अपोलो समूहाने गुरुवारी सांगितले की, स्पुटनिक-व्ही लस सुमारे १,१९५ रुपयांत मिळेल. लसीची किंमत ९९५ रुपये आहे आणि ती देण्यासाठी २०० रुपयांचा खर्च येईल. समूहाच्या कार्यकारी उपाध्यक्ष शोभना कामिनेनी यांनी सांगितले की,‘जूनमध्ये आम्ही दर आठवड्याला १० लाख डोस देऊ. जुलैत ते वाढवून दुप्पट केले जातील. या वर्षी सप्टेंबरपर्यंत दोन कोटी लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. आमच्या समूहाने देशातील ८० ठिकाणी १० लाख डोस देण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यात फ्रंटलाइन वर्कर्स, जास्त जोखीम असलेले लोक आणि समूहाच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले आहे.’ कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिननंतर भारतात मंजुरी मिळालेली स्पुटनिक-व्ही ही तिसरी लस आहे. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत देशात स्पुटनिकच्या ३.५ ते ४ कोटी डोसचे उत्पादन करण्याची तयारी सुरू आहे.