महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. ३० मे ।राज्यात एकीकडे करोनाचा धोका आणि दुसरीकडे कडाक्याचा उन्हाळा होता. पण या उन्हाळ्यापासून आता लवकरच नागरिकांना दिलासा मिळणार आहे. राज्यात महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाला (Rain) सुरुवात होणार असल्याची माहिती वर्तवण्यात येत आहे. यामुळे गरमी कमी होऊन नागरिकांना गारवा अनुभवता येणार आहे.पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुणे, मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे ४ दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
खरंतर, मार्चपासून आत्तापर्यंत उन्हाळ्याच्या काळात राज्यभरातच सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. लातूर, अहमदनगर, अकोला, नंदुरबार, हिंगोली हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त आणि तीव्र अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. सांगली, जालना, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये या आठवड्यातील पाऊस भर घालेल.
दरम्यान, मान्सून विभागाच्या म्हणण्यानुसार, 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मॉन्सून सामान्यच्या 98 टक्के राहील, असा अंदाज आहे तर 15 मे रोजी भारतीय हवामान विभाग पावसाचा पुढचा अंदाज सांगणार आहे.
पावसाळ्याआधी शेतीची अनेक काम सुरू झाली आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी धान्याची पेरणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा वेळेवर दाखल होणार मान्सून हा शेतकऱ्यांसाठीदेखील लाभदायक असणार आहे. भारतातील सुमारे 200 दशलक्ष शेतकरी धान्य, ऊस, मका, कापूस आणि सोयाबीन यासारख्या अनेक पिके पेरण्यासाठी मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करतात.