महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जून । पिंपरी चिंचवड ।शहरातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सद्यपरिस्थितीत ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयामध्ये एकही रुग्ण नाही. ही बाब समाधानकारक आहे. पिंपरी-चिंचवडकरांना दिलासादायक आहे. मे महिन्याच्या पंधरवाड्यापासून शहरातील रुग्णसंख्येत घट होत आहे सध्या रुग्णसंख्या पाचशेच्या आतमध्ये आली. परिणामी रुग्णसंख्येअभावी ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालय बंद करण्यात आले आहे. शहरात रुग्णसंख्या घटल्याने महापालिकेने पाच कोविड केअर सेंटर (सीसीसी) यापूर्वीच बंद केले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पिंपरी येथील ऑटो क्लस्टर कोव्हिड रुग्णालय बंद करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी रुग्णसेवा बजावणारे कोव्हिड योद्धे यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगारच दिला गेलेला नाही. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता त्यांना कामावरून काढण्यात आलेले आहे. अर्थात या कोव्हिड योद्ध्यांना महापालिका प्रशासनाने वाऱ्यावर सोडून दिल्यामुळे या कोव्हिड योद्ध्यांनी ऑटो क्लस्टरच्या प्रांगणात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या योद्ध्यांंकडून डोळ्यावर काळी पट्टी बांधून महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. गेंड्याची कातडी असलेले महापालिका अधिकाऱ्यांनी आद्याप या ठिकाणी भेट दिलेली नाही.
या कोरोना योद्ध्यांच्या मागण्या एवढ्याच आहे की, कोणतीही पूर्वसूचना न देता काम बंद करणे हे आम्हाला मान्य नाही. तसेच गेल्या तीन महिन्यांचा पगार देखील मिळालेला नाही. आतापर्यंत आम्ही बजावलेली सेवा लक्षात घेऊन कोव्हिड आजार असे पर्यंत आम्हाला सेवा करण्याची संधी देण्यात यावी. व जॉबची खात्री देण्यात यावी. अन्यथा पर्यायी रुग्णालयामध्ये सेवा बजावण्याची सोय करावी. जो पर्यंत आमच्या रोजगाराचा प्रश्न सुटत नाही तो पर्यंत आम्हा सर्व कोव्हिड योद्ध्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करावी, अशी माहिती ऋषी घुले यांनी महाराष्ट्र 24 ला दिली.
मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत महापालिका प्रशानाचे अधिकारी या योद्ध्यांबाबत योग्य निर्णय घेणार, असे आश्वासन या योद्ध्यांना देण्यात आले होते. मात्र अद्याप या ठिकाणी कोणीही आलेले नाही. त्यामुळे काळी पट्टी बांधून या कोव्हिड योद्ध्यांचे हे आंदोलन सुरूच आहे.