महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जून । योगगुरु बाबा रामदेव हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरत आहेत. अॅलोपॅथी उपचारपद्धतीसंदर्भात केलेल्या एका वक्तव्यासाठी त्यांना स्पष्टीकरणवजा माफीही मागावी लागली. इतकंच नव्हे तर आपले उदगार त्यांना परतही घ्यावे लागले. असं असलं इंडियम मेडिकल असोसिएशन यांच्यात अद्यापही खटके उडतच आहेत. याच वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं असताना योगगुरु बाबा रामदेव यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत आपली बाजू स्पष्ट केली.
आपल्या विधानावरुन वाद निर्माण झाल्याचं लक्षात आल्यानंतर भूमिका स्पष्ट करताना बाबा रामदेव म्हणाले, ‘मी अॅलोपॅथी आणि डॉक्टरांच्या विरोधात नाही. आयएमएच्या विरोधात जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही. ही लढाई तर, औषध माफियांच्या विरोधात आहे. जे 2 रुपयांचं औषध 2 हजार आणि केव्हा केव्हा तर 10 हजार रुपयांना विकतात. गरज नसतानाही शस्त्रक्रिया करतात.’
अनेकदा तर औषधांचा अधिक मारा केल्यानं काय परिणाम होतात हे तर एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांच्याकडूनही आपण ऐकल्याचं म्हणत मी वाद संपवू इच्छितो असी ठाम भूमिका त्यांनी मांडली. मेडिकल सायंसनी एडवांस सर्जरी आणि आयुष्य वाचवणाऱ्या औषधांच्या रुपात मोठी प्रगती केली आहे. मी स्वत: मेडिकल सायंन्सचा आदर करतो. असं म्हणत असतानाच आयुर्वेदामुळंही अनेक जीवघेणे आणि दुर्धर आजार बरे होत असल्याचा दाखला त्यांनी दिला.