महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जून । पावसाची सुरुवात होण्याच्याच काळात दरवर्षी कोळी बांधव मात्र त्यांची गलबतं माघारी घेण्याच्या गडबडीत दिसतात. यंदाच्याही वर्षी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अन्वये 1 जून ते 31 जुलै या साधारण दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मासेमारी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील आठवड्यातच हे आदेश देण्यात आले. याच धर्तीवर आता कोळी बांधवांनी त्यांची गलबतं समुद्रातून माघारी आणण्यास सुरुवात केली.
आजपासून 31 जुलै पर्यत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत मासेमारी बंदी करण्यात आली आहे. मच्छ विभागाच्या धोरणानुसार ही बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असले. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बिजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते.
महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियम 1981 अन्वये मासेमारीवर काही काळासाठी निर्बंध येणार असले तरीही मुंबईतील कुलाबा भागातील किनारपट्टीमध्ये 12 सागरी मैलांपर्यंत पारंपरिक पद्धतीने कोळी बांधव मासेमारी करु शकणार आहे. ब्रिटीश काळापासून सुरु असणारी ही मासेमारी मात्र थांबणार नाही. कुलाबा कोळीवाडा आणि तत्सम भागांमध्ये या मोसमात मासेमारीचा अधिक वाव असतो, अशी माहिती दर्यावर्ती महिला संघाच्या अध्यक्षा राजेश्री विजय नाखवा (कुलाबा) यांनी दिली.