महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जून । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संचारबंदीतून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. नागरिकांना 15 जूनपर्यत सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत व्यवहार करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा वगळता दुपारी तीन नंतर विनाकारण भटकंती करणार्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे नागरिकांनो तुमचे व्यवहार दुपारी तीनवाजेच्या आतमध्ये आवरून घेणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, मंगळवारपासून सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत व्यवहार करण्यास नागरिकांना शासनाने परवानगी दिली आहे. त्यानंतर विनाकारण भटकंती किंवा अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त फिरणार्याविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यासाठी सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व कामे आटपून घ्यावीत. त्यानंतर प्रवास करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याशिवाय दुकाने उघडी ठेवण्यावरही निर्बध घालण्यात आले आहेत. नियमावलीचे उल्लंघन करणार्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. विनामास्क प्रवास, ठोस कारणांशिवाय भटकंती करणार्यांविरूद्ध कारवाई करण्यात येणार आहे. 15 जूनपर्यंत दुपारी तीनपर्यंत नागरिकांनी नियमातून काहीसी सुट देण्यात आली आहे. त्यामध्येही नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
दुपारी तीननंतर संचारबंदी कायम असल्यामुळे कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी घरीच बसण्याचे पोलिसांनी सूचित केले आहे. सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत.