तुम्हालाही पहाटे ठराविक वेळेत जाग येते ? शुभसंकेत मिळतात ; वेळेचा सदुपयोग करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । झोपेतून जाग येणे यात कदाचित काही विशेष नसेलही, परंतु रोज ठराविक वेळेतच जाग येणे, तेही पहाटे, हा ईश्वरी संकेत आहे असे समजावे. पहाटे ३ ते ५ ही वेळ ब्रह्म मुहूर्त म्हणून ओळखली जाते. या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात, हे आपण सगळेच जाणतो. परंतु अनेकांना ठरवूनही या वेळी जाग येत नाही. अलार्म बंद करून ते झोपी जातात. याउलट तुम्हाला त्या वेळेत जाग येत असेल, तर तुम्ही खरोखरच नशीबवान आहात असे समजा.

ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली होती. म्हणून त्या मुहूर्ताला ब्रह्म मुहूर्त तसेच ईश्वरी मुहूर्त असे म्हणतात. ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी असते. प्रभाव कोणावर? तर जी व्यक्ती या वेळेचा सदुपयोग करते, त्यावर! या वेळेत शक्ती, बुद्धी, बल, तेज असे आरोग्याशी निगडित जे घटक हवे, ते सगळे प्राप्त होतात. या कालावधीत नभोमंडलातील ग्रहस्थिती आपल्या प्रगतीकरिता उत्तम असते. वातावरण शुद्ध असते. परिसर शांत असतो. त्यामुळे या कालावधीत जे काही मनाशी ठरवाल, ते अवश्य प्राप्त करू शकाल, असा ब्रह्म मुहूर्ताचा महिमा आहे.

भगवान श्रीकृष्ण यांनीदेखील भगवद्गीतेत अर्जुनाला ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे महत्त्व सांगितले आहे. आपले पूर्वज, ऋषी मुनी ब्रह्म मुहूर्तावर उठून दिन चर्येची, ध्यानधारणेची सुरुवात करत असत. याउलट आपण, सूर्य डोक्यावर आला, तरी अंथरूण सोडत नाही.

परंतु तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत असेल, तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका. तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे ते संकेत आहेत. या वेळेचा सदुपयोग करा. तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल. परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील. यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्म मुहूर्तावर जाग आली, की आपल्या ध्येयाप्रती चांगली कामगिरी करा. ध्येय निश्चित नसेल, तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या. तन सुदृढ असेल, तर मन ही सुदृढ असेल. शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल.

हे शुभचिन्ह ओळखा आणि आपले आयुष्य आंतर्बाहय बदलण्याची संधी अजिबात दवडू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *