कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता शाळा ऑनलाइनच सुरू होणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदाही शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली. भविष्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता प्रत्यक्षात ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू होण्यासाठी आणखी २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली.

कोरोनाच्या सावटामुळे गेल्यावर्षी शाळा ऑनलाइन सुरू हाेत्या. नववी ते बारावी, तसेच इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग काही दिवस प्रत्यक्ष सुरू झाले होते. हे वगळता संपूर्ण शैक्षणिक वर्षात व्हिडिओ कॉल, यू-ट्यूब, व्हॉटस्‌ॲप, गुगल क्लासरूम, दूरदर्शन अशा माध्यमांचा वापर करून ऑनलाइनद्वारेच विद्यार्थ्यांना शिकविले गेले. यंदाही १४ जूनपासून शाळा सुरू होणार असल्या, तरी त्या ऑनलाइन सुरू होतील; परंतु शाळा सुरू झाल्यानंतर आधीच्या वर्गातील महत्त्वाच्या अभ्यासक्रमाची पुन्हा उजळणी करून घेतली जाणार आहे.

मागील वर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेताना नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या मागील वर्षाची उजळणी घेण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण विभागाने केली हाेती. त्यासाठी ‘ब्रीज कोर्स’ तयार करण्यात येत आहे.

मागील वर्षभराहून अधिक काळ शाळा बंद होत्या. त्यामुळे यंदा शैक्षणिक वर्ष सुरू करताना सर्व गोष्टींचा, विषयांचा तसेच परीक्षा, चाचण्या नियोजनाचा आराखडा शाळांना तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘ब्रीज कोर्स’ची आखणी होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *