शिवश्री श्रीमंत कोकाटे यांच्याशी छावा स्वराज्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांची सखोल चर्चा
महाराष्ट्र 24 । पुणे । विशेष प्रतिनिधी ।
वरिष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकामध्ये केले आहे. या संदर्भात छावा स्वराज्य सेनेच्या पदाधिकार्यांनी इतिहास अभ्यासक, नामवंत वक्ते शिवश्री श्रीमंत कोकाटे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक राम घायतिडक पाटील यांनी या विकृतीबाबत तसेच बदनामीकारक लिखाणाचा तीव्र निषेध केला आहे. गिरीश कुबेर यांच्यावर दावा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.
श्रीमंत कोकाटे यांच्याकडून बदनामीकारक मजकूर असलेल्या रेनिसन्स स्टेट पुस्तकातील पानांच्या प्रति घेऊन छावा स्वराज्य सेनेचे पदाधिकारी गिरीश कुबेर यांच्यावर दावा दाखल करणार असून, तमाम शिव-शंभू प्रेमींची मने दुखावली गेल्याने कुबेर यांनी सर्व शिव-शंभू प्रेमींची तसेच महाराष्ट्रातील सर्वांची जाहीर माफी मागावी, असे दाव्यामध्ये नमूद करण्यात येणार असल्याचे छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक, अध्यक्ष राम घायतिडक पाटील यांनी महाराष्ट्र 24 ला सांगितले.
“रेनिसन्स स्टेट” या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज व थोरले शाहू महाराज यांची बदनामी होईल असे विकृत लेखन करण्यात आले आहे. यातून लेखक गिरीश कुबेर यांचे शिवद्रोही व शंभुद्रोही विचार स्पष्ट होत आहेत. याबाबत कोकाटे यांच्याशी सखोल चर्चा करण्यात आली. श्रीमंत कोकाटे यांनी पूर्ण पुस्तक वाचून काढले असून, त्यांनी त्यातील सर्व बदनामीकारक मजकूर अधोरेखित केला आहे.
यावेळी छावा स्वराज्य सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफभाई शेख, पुणे शहर अध्यक्ष गणेश कांबळे, पुणे शहर उपाध्यक्ष खलिदभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते अमरजित पाटील (पंढरपूर) आदी उपस्थित होते.