महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ जून । नवे माहिती तंत्रज्ञान विषयक नियम नीट लागू न केल्याप्रकरणी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाने ट्विटरला पुन्हा एक नोटीस पाठवली आहे. ही अंतिम नोटीस असून यानंतरही जर ट्विटरने नियमांचे पालन केले नाही तर त्यांना कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल अशी ताकीद देण्यात आली आहे.
टूलकिट वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टांगती तलवार आली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला केंद्र सरकारने तीन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत 25 मे रोजी समाप्त झाली होती. त्यामुळे नव्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर बंदी येऊ शकते असं बोललं जात होतं. माहिती तंत्रज्ञान विभागाने ट्विटरला पाठवलेल्या नोटीसमुळे ही भीती पुन्हा वर्तवली जाऊ लागली आहे.
Govt gives "one last chance" to Twitter to comply with new IT rules: MeitY in notice to microblogging website
— Press Trust of India (@PTI_News) June 5, 2021
27 मे रोजी ट्विटरने सोशल मीडियाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांविषयी मौन सोडले होते. त्यावेळी सोशल मीडिया कंपनी ट्विटरने केंद्र सरकारकडून नवीन गाईड लाइन लागू करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी मागितला होता. या नवीन आयटी नियमांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याबाबत चिंता ट्विटरने व्यक्त केली होती.
ट्विटरने नव्या नियमावलीबाबत बोलत असतानाच अलीकडे कंपनीच्या दिल्ली आणि गुडगाव येथील कार्यालयांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल आणि कर्मचाऱयांच्या सुरक्षिततेबद्दलही काळजी व्यक्त केली होती. ‘ज्या लोकांना आम्ही सर्व्हिस देतो, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलदेखील आम्ही काळजीत आहोत’ असं ट्विटरने म्हटलं होतं. ट्विटरने थेट दिल्ली पोलिसांचे नाव न घेता हिंदुस्थानसह जगभरातील पोलिसांच्या धमकी देणाऱया प्रवृत्तीबद्दल चिंतेत असल्याचे सांगितले आहे.