महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ जून । पुढच्या वर्षी औरंगाबाद, मुंबईसह दहा महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन प्रभाग रचना बदलाचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केले. िद्वसदस्यीय प्रभाग रचना हवी, असे मत पवार यांनी मांडले. सन २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे भाजपला फायदा झाला होता. त्यामुळेच भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने मुंबई महापालिकेच्या प्रभागाच्या सीमा पूर्ववत कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोरोनामुळे औरंगाबाद, नवी मुंबई, ठाणे अशा दहा महानगरपालिकांच्या निवडणुका गतवर्षी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तिथे सध्या प्रशासकीय राजवट आहे. आता पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूकही नियोजित आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अन् प्रतिष्ठेची असून सन २०१७ मध्ये प्रभाग रचनेत बदल केल्यामुळे भाजपला फायदा झाल्याचे शिवसेना आणि काँग्रेसचे म्हणणे आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकांवेळी तत्कालीन फडणवीस सरकारने सध्याची चार सदस्यीय प्रभाग रचना केली होती. यामुळे विकासकामांना खीळ बसते अशी सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांची ओरड आहे. तसेच चार सदस्यीय प्रभाग रचनेचा लाभ मागच्या निवडणुका भाजपला झाला होता, असा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे.
त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. चार सदस्यीय प्रभाग रचनेच्या बदलामुळे राष्ट्रवादीची पुणे महापालिकेतील सत्ता गेली, असे राष्ट्रवादीचे नेते दावा करत आहेत. त्यामुळे प्रभाग रचनेतील बदलाच्या हालचाली लवकरच गतिमान होतील, अशी शक्यता आहे.