महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ जून । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनावरील उपचारांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे. यानुसार, ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत किंवा त्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची औषधे घेण्याची गरज नाही. परंतु इतर आजारांसाठी सुरू असलेली औषधे सुरू ठेवावीत. अशा रूग्णांनी टेली कंसल्टेशन (व्हिडिओद्वारे उपचार)घ्यावे. चांगला आहार घ्यावा आणि मास्क, सोशल डिस्टेंसिंग यासारखे आवश्यक नियमांचे पालन करावे.
डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस (DGHS) यांनी नवीन गाइडलाइननुसार असिम्प्टोमेटिक रूग्णांच्या उपचारांमध्ये वापरली जाणारी सर्व औषधे या यादीतून काढून टाकली आहेत. यामध्ये ताप, सर्दी आणि खोकला या औषधांचादेखील समावेश आहे. मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, अशा संक्रमित लोकांना इतर टेस्ट करून घेण्याची देखील गरज नाही. यापूर्वी 27 मे रोजी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आली होती, ज्यात सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, इव्हर्मेक्टिन, डॉक्सीसाइक्लिन, झिंक आणि मल्टीविटामिन वापरण्यास मनाई होती. याशिवाय एम्प्म्पोमॅटिक रूग्णांना सीटी स्कॅनसारख्या अनावश्यक टेस्ट लिहून देण्यासही मनाई होती.