हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूनंतर शालिनी ठाकरे यांनी एक खरमरीत पत्र लिहित समाजाच्या डोळ्यात अंजन घातलं आहे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ : हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूची बातमी आली आणि अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. संवेदना असणारा प्रत्येकजण या घटनेबाबत संताप व्यक्त करत आहे. पीडितेचं मूळ गाव असलेल्या दारोडामधील नागरिकांनी तर थेट कायदा हातात घेत पोलिसांवरच दगडफेक केली. अनेक महिलांनी त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी केली आहे. आमच्या मुलीला जसा त्रास झाला त्या नराधमालाही तसाच त्रास व्हायला हवा, असं म्हणताना गावकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे.

दारोडा गावातील मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांमध्ये प्रचंड चीड आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तोडफोडीच्याही घटना घडत असल्याचे दिसत आहे. संतप्त जमावावर नियंत्रण करणे पोलिसांना अवघड जात आहे. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला आहे. येथील नागरिक प्रचंड संतापले असून ते न्यायाची मागणी करीत आहेत. नराधमाला लवकरात लवकर फासावर लटकवा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या या घटनेचा लोकांमध्ये राग आहे. महाराष्ट्रभर असा आक्रोश सुरू असताना मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी एक खरमरीत पत्र लिहित समाजाच्या डोळ्यात अंजन घातलं आहे.

शालिनी ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र :

“प्रिय निर्भया,

कुणी तरी तुझ्यावर अ‍ॅसिड टाकतं, कुठेतरी तुझ्यावर बलात्कार होतो किंवा कधीतरी तुला रॉकेल टाकून पेटवून दिलं जातं… मग तुझं खरं नाव समाजाला समजू नये. तुझी ओळख उघड होऊन तुझ्या आणि तुझ्या कुटुंबियांच्या वेदना आणखी वाढू नयेत म्हणून आम्ही तुझं नामकरण करतो- ‘निर्भया’. जी कुणालाही घाबरत नाही. जिला कसलंही भय नाही ती ‘निर्भया’!

महिलांना समान न्याय, समान संधी, समान वेतन आणि त्यातून महत्वाचं म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने समान सन्मान देणारी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा तुला ‘निर्भया’ हे नाव ठेवणं आम्हाला अधिक सोयीचं वाटतं.

त्यानंतर दोन-चार दिवस महिलांच्या सुरक्षिततेविषयीच्या बातम्या येतात. मोठमोठे लेख लिहिले जातात. ‘निर्भया’च्या वैद्यकीय उपचारांचा खर्च आम्ही करू असं सरकार जाहीर करतं…!

कारण हे सगळं सोपं आहे गं, आमच्यासाठी.

तुझ्यावर घरात, शाळा-कॉलेजात, रस्त्यात किंवा अगदी ट्रेनमध्ये अत्याचार होणार नाही याची काळजी घेण्यापेक्षा तुझा वैद्यकीय खर्च उचलणं सोपं आहे, पटतंय ना!

मग एक दिवस तू थकतेस. दमतेस आणि शेवटचा श्वास घेऊन मोकळी होतेस.

आठ वर्षांपूर्वी तू दिल्लीत होतीस. तीन वर्षांपूर्वी नगरला. गेल्या महिन्यात पुण्यात आणि मागच्याच आठवड्यात हिंगणघाटात! पण चिंता करू नकोस. आम्ही तुला न्याय मिळवून देऊ. आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयात जाऊ. तुझं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त करणाऱ्याला शिक्षा व्हावी, म्हणून आम्ही वर्षानुवर्षं न्यायालयात तुझी बाजू मांडू! आणि पुढची १० वर्षं त्या न्यायालयीन लढ्याच्या बातम्या दैनिकांच्या आतल्या पानांवर येत राहतील, अशी तरतूद करू.

आणि हो, एक राहिलंच.

तुझ्यासाठी एक मेणबत्ती मोर्चाही काढू!

तुझीच,

सौ. शालिनी जितेंद्र ठाकरे “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *