वारंवार अॅसिडीटी होत असल्यास करा या पदार्थांचे सेवन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जून । अनेक वेळा वेळी अवेळी खाण्यापिण्याने किंवा जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी उद्भविणे, पोटामध्ये गॅसेस होणे, मळमळणे, उलटी होणार असल्याची सतत भावना होणे, श्वासाची दुर्गंधी यांसारख्या तक्रारी उद्भवितात. ही लक्षणे अॅसिडीटीची असू शकतात. वेळी अवेळी खाणे पिणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे आजकाल अनेक जण सतत अॅसिडीटीने त्रस्त असतात. पचनक्रियेसाठी सहायक असणाऱ्या अॅसिड्समध्ये असंतुलन निर्माण झाले की शरीरामध्ये अॅसिडीटीचा त्रास सुरु होतो. या करिता वारंवार औषधे घेण्यापेक्षा काही खाद्यपदार्थांच्या सेवनाने या वर उपचार करणे शक्य आहे.

थंड दुध अॅसिडीटी शमविण्यास मदत करते. तसेच अॅसिडीटीमुळे पोटामध्ये आणि छातीमध्ये होणारी जळजळ देखील थंड दुधाच्या सेवनाने कमी होते. थंड दुधामध्ये थोडी साखर घालून हे दुध फ्रीजमध्ये ठेवावे, व थोड्या थोड्या वेळाने हे दुध थोडे थोडे पीत राहावे. याने अॅसिडीटी नाहीशी होण्यास मदत होईल. तसेच तुळशीच्या पानाच्या रसाच्या सेवनाने देखील अॅसिडीटी कमी होते. तुळशीच्या पानांच्या रसाने गॅस्ट्रीक अॅसिड्सचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे अॅसिडीटी होते आहे असे वाटल्यास त्वरित तुळशीची काही पाने खावीत.

केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोटॅशियम आणि फायबर असते. यामुईल पोटातील अॅसिड्स नियंत्रित होण्यास मदत होते. त्यामुळे अॅसिडीटी चा त्रास होत असल्यास पिकलेले केळे खावे. बडीशेपेमध्ये अँटी-अल्सर गुण आहेत. तसेच बडीशेपेमुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते, व बद्धकोष्ठ होत नाही. म्हणूनच जेवण झाल्यानंतर बडीशेप खाण्याची पद्धत आहे. ज्यांना वारंवार अॅसिडीटीचा त्रास होतो, त्यांनी थोडी बडीशेप रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेऊन सकाळी हे पाणी रिकाम्यापोटी घ्यावे.

अॅसिडीटी झाल्याने पोटदुखी होत असेल, तर वेलदोडा, म्हणजेच वेलची खावी. याच्या सेवनाने पोटातील अॅसिड्सचे प्रमाण नियंत्रित राहते. थोडी वेलची कुटून घेऊन पाण्यामध्ये घालावी आणि हे पाणी उकळून घ्यावे. हे पाणी थंड झाल्यावर याचे सेवन केल्याने अॅसिडीटी कमी होण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *