महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जून । सोन्याचांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या घसरणीनंतर आता सोन्याच्या दरात तेजी आली आहे. मंगळवारी 9 जून रोजी एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 0.10 टक्क्यांची वाढ झाली आहे. चांदीच्या दराबाबत बोलायचं झालं तर चांदीच्या दरात 0.22 टक्क्यांची वाढ झाली आहे. आज एमसीएक्सवर (MCX) ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात 0.10 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे दर 49,174 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. चांदीचे दर 0.22 टक्क्यांच्या वाढीनंतर 71,388 प्रति किलो झाले आहेत.
जरी आज सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरीही हा भाव गेल्यावर्षीच्या सर्वोच्च स्तरापेक्षा जवळपास 7000 रुपयांनी कमी आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते.
कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता?
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.