महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ जून । फास्ट बॉलर ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) याच्या वादग्रस्त ट्विटमुळे इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप आला आहे. रॉबिन्सन पाठोपाठ आता अनेक दिग्गज खेळाडूंचे वादग्रस्त ट्विट्स समोर येत आहेत. या खेळाडूंची चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची तयारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) सुरू केली आहे. इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) याचे 11 वर्षांपूर्वीचे एक ट्विट आता व्हायरल (Tweet Viral) झाले असून त्यामुळे तो अडचणीत येण्याची शक्यता आहे.
इंग्लंडचा सर्वात यशस्वी फास्ट बॉलर असलेल्या अँडरसननं हे ट्विट फेब्रुवारी 2010 मध्ये केले होते, असे सांगितले जात आहेत. यामध्ये त्याने स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) लेस्बियन व्यक्तीसारखी हेअरकट केली आहे, असे म्हंटले होते. “मी आज ब्रॉडीचा नवा हेअरकट पाहिला. मला याबाबत खात्री नाही, पण तो 15 वर्षांच्या लेस्बियनसारखा वाटत आहे.’ असे ट्विट अँडरसनने केले होते.
हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर अँडरसनमं याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ही 10-11 वर्षांपूर्वी घटना आहे. त्यानंतर एक व्यक्ती म्हणून मी बदललो आहे. माझ्या मते ही एक अवघड गोष्ट आहे. घटना सतत बदलत असतात आणि तुम्ही चुका करता. जर काही वर्षांपूर्वीचे ट्विट असेल तर त्यावर आपल्याला विचार करायला हवा. या प्रकरणातून धडा घेऊन भविष्यात सतर्क राहण्याची गरज आहे. या प्रकारची भाषेचा वापर भविष्यात केला जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.’ जेम्स अँडरसनं गुरुवारी 162 वी टेस्ट मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तसे झाले तर तो इंग्लंडकडून सर्वात जास्त टेस्ट मॅच खेळणारा खेळाडू बनेल. मात्र आता या ट्विटमुळे आपण गुरुवारची टेस्ट खेळणार की नाही? याची काळजी अँडरसनला सतावत आहे.
जेम्स अँडरसन प्रमाणेच इयन मॉर्गन, जोस बटल, जो रूट आणि डॉम बेस या इंग्लंड टीममधील क्रिकेटपटूंच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्या आहेतय या ‘कथित पोस्ट’ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या अडचणीत देखील भर पडण्याची शक्यता आहे. रॉबिन्सन प्रकरणानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंच्या जुन्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत, या प्रकरणाची चौकशी देखील करणार असल्याची घोषणा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केली आहे.