महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ जून । देशात दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. अनेक राज्यात तर पेट्रोलने शंभरी गाठली आहे. या वाढत्या दराlचा विरोध करण्यासाठी काँग्रेस पार्टीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात 11 जून रोजी पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरुद्ध सर्व पेट्रोल पंपांसमोर काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत असलेल्या किंमती आणि वाढत चाललेली महागाई या विरोधातही हे आंदोलन असणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना काँग्रेस नेते गोविंद सिंह दोतासरा यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर आणि अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली असून आकाशाला भिडल्या आहे. त्यामुळे आम्ही पेट्रोल पंपासमोर 11 जून रोजी आंदोलन करणार आहोत.
पुढे ते म्हणाले, कच्च्या तेलाचे दर 2014 मध्ये 108 यूएस डॉलर प्रति बॅरल इतका होता. त्यावेळी पेट्रोल 71 रुपये तर डिझेल 57 रुपये प्रति लिटर इतके होते. 2021 मध्ये पेट्रोलसाठी 102.82 रुपये तर डिझेलसाठी 95.96 रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहेत. वाढत्या महागाईने तर सामान्य जनतेचे जीवन जगणे अशक्य करून ठेवले आहे.