महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जून । वाढता खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आपला मोर्चा सरकारी कर्मचाऱ्यांकडे वळवला आहे. केंद्र सरकारची विविध कार्यालये आणि मंत्रालये यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईम भत्ता आणि इतर काही सुविधांना कात्री लावण्याचं ठरवलं आहे. या भत्ते आणि सुविधांमध्ये 20 टक्के कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना काळात वाढता खर्च आणि घटलेले उत्पन्न यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थमंत्रालयाने गेल्या वर्षी दोन वेळा मंत्रालये आणि विविध विभागांमध्ये होणारा खर्च कमी करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यावेळी ओव्हरटाईम भत्ता आणि इतर काही सुविधांना कात्री लावण्यात आली नव्हती.
या गोष्टींवरील खर्च करण्याचे निर्देश
देशांतर्गत प्रवासावर होणारा खर्च
विदेश यात्रेवर होणारा खर्च
कार्यालयातील खर्च
भाडी
रॉयल्टी
प्रकाशने
अन्य प्रशासकीय खर्त
जाहिराती आणि प्रचार
देखभाल
सेवा शुल्क
वस्तू पुरवठा आणि सामग्री
गुरुवारी अर्थमंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. हे निवेदन सगळ्या सचिवांना, केंद्रीय मंत्रालयांना आणि विभागांच्या आर्थिक सल्लागारांना पाठवण्यात आले आहे. वायफळ खर्च थांबवा आणि ओव्हरटाईम भत्ता आणि इतर काही सुविधांवर करण्यात येणाऱ्या खर्चात 20 टक्के कपात करा असं या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याचे वृत्त आजतक या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अर्थमंत्रालयाशी निगडीत एका अधिकाऱ्याने या आदेशाबाबत बोलताना सांगितले की या सगळ्या गोष्टीवर होणारा खर्च कमी करण्याची हीच योग्य वेळ आहे, कारण सध्या पूर्ण क्षमतेने कार्यालये सुरू नाहीयेत.