महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जून । केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात आता मोठे फेरबदल करण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीतच खांदेपालटावर चर्चा झाली असे सांगितले जात आहे.गेल्या काही दिवसांपासून पीएम मोदी केंद्रीय मंत्र्यांसोबत वेग-वेगळ्या बैठका घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षांत कोणती कामे केली याचा आढावा घेतला जात आहे. यावेळी अनेक मंत्र्यांनी आपल्या कामाचे प्रेझेंटेशन सुद्धा मोदींसमोर मांडले. उल्लेखनीय बाब म्हणजे, नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांना पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हापासून त्यांच्या मंत्रिमंडळात कुठलेही बदल झालेले नाहीत. त्यावरून सुद्धा मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या वर्षभरात कोरोना काळामध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाचा योग जुळून आलेला नाही. कोरोनाचा वेग थंडावल्यानंतर आता फेरबदलाचे वारे वाहत आहेत. सद्यस्थितीला मोदींच्या मंत्रिमंडळात 21 कॅबिनेट, 9 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 29 राज्य मंत्री असे एकूणच 51 मंत्री आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाच्या मंत्र्यांकडे कामाचा व्याप वाढला आहे. काही मंत्र्यांकडे एकाचवेळी 3-3 विभागांचा भार लादला जात आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालयासह वाणिज्य आणि उपभोक्ता मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरणासह उद्योग मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आलेला आहे.
कृषी, पंचायत राज, ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे फूड प्रोसेसिंग विभागाचा अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे.
तर आयुष मंत्रालयाचे कामकाज पाहणारे किरण रिजीजू आधीच क्रीडा मंत्रालयाचे सुद्धा नेतृत्व करत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, फेरबदलात माजी मुख्यमंत्र्यांसह नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली जाऊ शकते. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, काँग्रेसमधून भाजपात आलेले ज्योतिरादित्य सिंधिया इत्यादी नावांची सध्या चर्चा आहे.