RTE Admission: आरटीईच्या प्रवेशासाठी वीस दिवसांचा कालावधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जून । पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे ७ एप्रिलरोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरटीई (RTE admission) लकी ड्रॉ काढण्यात आला होता. कोरोनामुळे ही प्रक्रिया रखडली होती. मात्र, एक जूनला लॉकडाऊन उघडल्यानंतर शुक्रवारपासून (ता.११) जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. निवड यादीतील विद्यार्थ्यांना ११ जूनापासून प्रवेशाकरिता २० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

– आरटीई प्रवेशासाठी ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे, त्यांनी ३० जूनपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा.
– प्रवेशासाठी पालकांनी शाळेत एकत्रितपणे गर्दी करू नये, प्रवेश घेण्यासाठी जाताना मुलांना सोबत घेवून जावू नये.
– शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या मोबाइलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, परंतु पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती व प्रवेशाचा दिनांक तपासून पहावा.
– प्रवेशाकरिता एसएमएसद्वारे सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळेत जावे.

आवश्‍यक कागदपत्रे-
– प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती सोबत ठेवाव्यात.
– आरटीई पोर्टलवरील हमीपत्र आणि अॅलोटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.
– फक्त निवड यादीतील विद्यार्थ्यांनीच ॲलोटमेंट लेटरची प्रिंट काढावी.

पालकांसाठी महत्वाच्या सूचना-
– निवड यादीतील बालकांचे पालक लॉकडाऊनमुळे बाहेरगावी किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाणे शक्य नसेल, तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा.
किंवा व्हॉट्सॲप, ईमेल किंवा अन्य माध्यमाद्वारे प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करुन पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.
– ३० तारखेच्या मुदतीनंतर निवड यादीतील संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.
– पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला, त्याच पत्त्यावर गुगल लोकेशनमध्ये लालमार्क दर्शविणे आवश्यक आहे. लोकेशन आणि घराचा नोंदविलेला पत्ता यात तफावत आढळल्यास प्रवेश रद्द होईल.
– पालकांना प्रवेशाबाबत काही अडचणी अथवा तक्रार असल्यास प्रवेश निश्चित झालेली शाळा ज्या तालुक्यात, मनपा क्षेत्रात आहे, तेथील तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करावी, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
– प्रतिक्षा यादीतील पालकांनी पाल्याच्या प्रवेशाकरिता शाळेत जाऊ नये. निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उर्वरित रिक्त जागा करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्राधान्य क्रमानुसार एसएमएस प्राप्त झाल्यानंतरच प्रिंट काढावी. त्यांच्या करिता आरटीई पोर्टलवर स्वतंत्र सूचना दिल्या जाणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *