महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जून । भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांची पत्नी निर्मल कौर यांचे पोस्ट कोविडच्या विविध गुंतागुंतीच्या आजारांमुळं निधन (milkha singhs wife nirmal dies) झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. निर्मल कौर या भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारही होत्या. यासह त्यांनी पंजाब सरकारमध्ये क्रीडा संचालक (महिलांसाठी) या पदावरही काम सांभाळले होते.
मिल्खा सिंग यांच्या परिवाराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निर्मल कौर यांचे रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. निवेदनात असेही म्हटले आहे की, मिल्खा सिंग हे सध्या रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये दाखल असल्यामुळे आपल्या पत्नीच्या शेवटच्या संस्कारात भाग घेऊ शकले नाहीत.
कोरोना विषाणूशी झुंज देणाऱ्या निर्मल कौर यांना 26 मे रोजी मोहालीच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांनाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुटुंबाच्या विनंतीवरून मिल्खा सिंग यांना एका आठवड्यानंतर सोडण्यात आलं. पण, निर्मल यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. नंतर मिल्खा सिंग यांना पीजीआयच्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आलं. मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीमध्ये सातत्यानं सुधारणा होत आहे.
पीजीआय येथे सध्या सुरू असलेल्या उपचारांमध्ये मिल्खा सिंग यांची तब्येत दिवसेंदिवस सुधारत आहे. पीजीआय डॉक्टरांच्या टीमद्वारे मिल्खा सिंग यांच्यावर सातत्याने नजर ठेवली जात आहे. बुधवारी त्यांच्या नाकातील अन्न देण्यासाठीची असलेली पाईप काढून टाकली आहे. तेव्हापासून ते स्वत:हून जेवण खात आहेत. मंगळवारपर्यंत त्यांना नाकात बसलेल्या पाईपद्वारे जेवण दिलं जात होतं. त्याचबरोबर त्यांच्या ऑक्सिजनची पातळीही वेगानं सुधारत आहे.