12 वीच्या निकालाबाबत राज्याचा फॉर्म्यूला आज निश्चित होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जून । आज बारावी निकालाबाबत बैठक आयोजित केल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)यांनी दिली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12 वीच्या निकालाबाबत CBSE च्या धर्तीवर सूत्र ठरवून त्यावर निर्णय घेण्यासाठी आज बैठक बोलावण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. 12 वीच्या निकालाचं सूत्र ठरवण्यासाठी शिक्षण विभाग आणि मंडळाचे अधिकारी, शिक्षक- पालक प्रतिनिधी, प्राचार्य यांची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. लोकसत्तानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. (Maharashtra State formula for 12th Result)

तसंच लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार, दहावीच्या निकालाचे काम करणाऱ्या शिक्षकांना उपनगरी रेल्वेप्रवास करण्यास मुभा नसल्याच्या गोंधळामुळे निकालास जुलै अखेरपर्यंत विलंब होण्याची शक्यता आहे. दरम्यान हा विलंब होऊ नये, यासाठी शिक्षकांना परवानगीची प्रक्रिया येत्या दोन ते चार दिवसांत पार पाडण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

दहावी निकालाचे काम करण्यासाठी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रात (MMRDA) शिक्षकांना आणि मुख्याध्यापक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरी रेल्वेगाड्यांमधून प्रवासाची परवानगी हवी होती. अशा शिक्षकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रवासाची परवानगी दिली असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं आहे.

तसंच मंडळाकडे गुण पाठवण्यासाठी शाळांना जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. शाळांकडून गुण पाठवण्याच काम झाल्यानंतर मंडळाकडून निकालाचं काम होईल, असं गायकवाड म्हणाल्यात. पण शिक्षकांना रेल्वे प्रवासाची मुभा मिळाल्यावर 10 वीचे गुण मंडळाकडे पाठवण्यासाठी 10-15 दिवसांचा कालावधी लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पूर्वीच्या परीक्षांचे रेकॉर्ड तपासून हे गुण द्यायचे आहेत. शाळांकडून मंडळाला गुण कळवल्यानंतर निकाल तयार करण्यासाठी बऱ्यापैकी दोन आठवड्यांचा वेळ लागेल. त्यामुळे रेल्वेप्रवासाच्या परवानगीला उशीर झाल्यास निकालालाही उशीर होईल, असं ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *