महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जून । कडक उपवास केल्याने किंवा उपवासाच्या पदार्थावर ताव मारल्यामुळे अनेकदा त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी उपवासाच्या दिवशी पोटाला त्रास न होणारे कोणते पदार्थ खावेत याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. .
काही आरोग्यदायी पदार्थ
राजगिरा : १०० ग्रॅम राजगिऱ्यात साधारणपणे १०३ उष्मांक आणि १९ ग्रॅम पिष्टमय पदार्थ असतात. त्यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम व पोटॅशियम ही खनिजेही आहेत. राजगिऱ्यात तंतूमय पदार्थही चांगले असून इतर कोणत्याही धान्यात ज्यांचा अभाव असतो असे ‘क’ जीवनसत्व आणि ‘लायसिन’ हे अमिनो आम्ल यात आहे. प्राणिजन्य पदार्थांइतकीच राजगिऱ्यातली प्रथिनेही चांगली असतात. राजगिऱ्याच्या पिठाचे थालीपीठ, घावन हे पदार्थ अतिशय चविष्ट लागतात. लहान मुले किंवा वजनाची चिंता करावी न लागणाऱ्या व्यक्तींसाठी राजगिऱ्याच्या पुऱ्याही करता येतील. राजगिऱ्याची खीर देखील जेवणाच्या ताटात समाविष्ट होऊ शकेल. मधल्या वेळच्या पदार्थामध्ये आणि ज्यांना गोड नको असेल त्यांना केवळ राजगिरा लाह्य दुधात घालूनदेखील खाता येतील.
शिंगाडा : शंभर ग्रॅम शिंगाडय़ातून सुमारे ९७ उष्मांक मिळतात. त्यात प्रथिने, कॅल्शियम, मॅग्निशियम आणि ‘क’ जीवनसत्व आहे, तर चरबीचे प्रमाण अजिबात नाही. आख्खा शिंगाडा (ताजा) मीठ घालून उकडून खाता येईल. शिंगाडय़ाच्या पिठाची खीर किंवा या पिठाची दाण्याच्या आमटीसारखीच आमटीही करता येते. शिंगाडय़ाचे पीठ साजूक तुपावर परतून त्यात खजूर घालून केलेले लाडू मधल्या वेळेसाठी चांगले.
वरीचे तांदूळ : ज्यांना उपवासाला वरीचे तांदूळ चालत असतील त्यांना ते उपवासाच्या दिवशी भातासारखे खाता येतील. वरीच्या तांदळातही जीवनसत्त्वे, खनिजे व तंतूमय पदार्थ आहेत.
उपवासाच्या फराळाच्या थाळीत वरीचे तांदूळ, शिंगाडय़ाच्या पिठाची आमटी, राजगिऱ्याच्या पिठाचे थालीपीठ, काकडीची कोशिंबीर वा भोपळ्याचे किंवा बटाटय़ाचे भरीत, सुरण खात असतील त्यांच्यासाठी सुरणाची भाजी हे पर्याय आहेत. गोडात सफरचंद, डाळिंब, केळं, पेर यांचे गाईच्या दुधाच्या दह्यत केलेले रायते किंवा फ्रुट सलाड घेता येईल. साजूक तुपात केळ्यांचे काप, साखर, खोबरे, थोडेसे दूध आणि वेलची घालून केलेला हलवादेखील चविष्ट.