अकरावीसाठी लेखी परीक्षा ; सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ऐच्छिक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । अकरावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी परीक्षा लेखी होणार असून, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिकशास्त्र या विषयांच्या राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमाआधारे ही परीक्षा होईल.सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ऐच्छिक असून, जुलैअखेर किंवा ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा ऐच्छिक असली तरी ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर दहावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहेत.

दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावीच्या प्रवेशाबाबत निर्माण झालेल्या प्रशद्ब्रांवर शिक्षण विभागाने स्वतंत्र प्रवेश परीक्षेचा तोडगा काढला. अकरावीसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून ही परीक्षा ऐच्छिक असेल. परंतु परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल, असे विभागाने जाहीर केले होते. ही परीक्षा राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमावर होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. सीबीएसईसह इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, खासगी मंडळाचे विद्यार्थीही ही परीक्षा देऊ शकतील. परीक्षेच्या आयोजनासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.

 

यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वाढण्याची शक्यता आहे. प्रवेश परीक्षा आणि दहावीच्या निकालाच्या माध्यमातून अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या वाढणार असून त्यामुळे अकरावीसाठी सर्वांना प्रवेश मिळणार का, असा प्रशद्ब्रा उपस्थित झाला आहे. मात्र, गेल्या वर्षी राज्यातील ३२ टक्के जागा रिक्त असून त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडचण येणार नाही, असे विभागाचे म्हणणे आहे. मात्र, काही विभागांत काही शाखांसाठी अधिक मागणी असते, तर गेल्या काही वर्षांपासून कला शाखेच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त राहात आहेत. त्यामुळे एकूण जागा रिक्त असल्या तरी विद्यार्थ्यांना हव्या त्या शाखेत प्रवेश मिळण्यासाठी चढाओढीला तोंड द्यावे लागणार आहे.

 

कुठे किती जागा रिक्त?

विभाग – प्रवेश क्षमता – रिक्त जागा (टक्केवारी)

अमरावती – १५३६० – ४४१० (२८.७१)

औरंगाबाद – ३१४७० – १४५२२ (४६.१५)

मुंबई – ३ लाख २०७७९ – ९६०८४ (२९.९५)

नागपूर – ५९२५० – २४४१६ (४१.२१)

नाशिक – २५२७० – ५५५८ (२१.९९)

पुणे – १ लाख ७२१५ – ३५४९३ (३३.१)

एकूण – ५ लाख ५९३४४ – १ लाख ८०४८३ (३२.२७)

 

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी भरलेले शुल्क अकरावी प्रवेश परीक्षेसाठी ग्राह््य धरण्यात येईल. मात्र, सीबीएसईसह इतर सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुल्क भरावे लागेल. त्याबाबतचे तपशील, परीक्षेचे अर्ज दहावीच्या निकालानंतर उपलब्ध होतील.लेखी परीक्षेसाठी शंभर गुणांची एकच प्रश्नपत्रिका असेल. इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र या प्रत्येक विषयाचे २५ गुणांचे प्रश्न या परीक्षेत विचारण्यात येतील. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ असेल. परीक्षा राज्यमंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर होईल.

 

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे राज्यातील दहावीचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन आठवड्यांत म्हणजे जुलैअखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अकरावीसाठी प्रवेश परीक्षा होईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे.मराठीला स्थान नाही… सर्व मंडळांच्या सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी बंधनकारक आहे. मात्र, प्रवेश परीक्षेत मराठीला स्थान दिलेले नाही. भाषांमध्ये फक्त इंग्रजीचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान इंग्रजी प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा यांसाठी प्रश्नपत्रिकेचे एकच स्वरूप असणार का, याबाबतही संदिग्धता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *