महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । कोरोना परिस्थितीचा विचार करून 2021-22 या शैक्षणिक वर्षात शासकीय इंजिनीयरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फीव्यतिरिक्त असलेल्या इतर शुल्कामध्ये 16 हजार 250 म्हणजेच अंदाजे 25 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली.
माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट (व्हीजेटीआय) येथे आज झालेल्या बैठकीत उदय सामंत यांनी आज राज्यातील शासकीय इंजिनीयरिंग महाविद्यालये आणि संस्थांचा आढावा घेतला. शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्काशिवाय इतर शुल्कही भरावे लागते. त्यात ग्रंथालय, जिमखाना व अन्य सुविधांचा समावेश आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांनी या सुविधांचा वापर केला नसल्याने त्यांना इतर शुल्कामध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला असे सामंत यांनी सांगितले.
बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
व्हीजेटीआयमधील मुलींच्या वसतिगृहाचे ‘मातोश्री’ नामकरण
या संस्थांना शिक्षक व शिक्षकेतर पदे पंत्राटी तत्त्वावर स्वतŠच्या निधीतून भरण्यास मान्यता
संस्थांच्या 2020-21च्या अर्थसंकल्पास मान्यता
बांधकामाचे प्रस्ताव असल्यास सादर करण्याच्या सूचना
या संस्थांना सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करण्यासाठी मान्यता देऊन त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना