करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; पुण्यातील निर्बंधांबाबत झाला मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । पुणे जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील करोना रुग्णांची सध्याची संख्या पाहता या आठवडयातील निर्बंधच पुढील आठवड्यात कायम राहतील. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागावे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. ( Pune Covid Restrictions Latest Update )

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सिल हॉल येथे दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील करोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी वळसे पाटील बोलत होते. वळसे पाटील म्हणाले की, जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. तसेच नियोजन करून पेसा भागातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. सुपर स्प्रेडर, दुकानदार, मार्केटमधील व्यवसायिक यांची करोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहे. तसेच दर पंधरा दिवसांनी रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट ( RAT) बंधनकारक करण्यात आलेली आहे. दिव्यांग नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता प्रशासनाने तयारी केलेली आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून काळजी घेण्याची गरज असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

प्रशासनाने म्युकरमायकोसिस रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता प्रशासनाने व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. पर्यटनाला व सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे. विवाह समारंभात नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, हॉटेल व्यवस्थापन व मंगल कार्यालयांनी प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी. जे नियमांची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये पंधरा जुलैपर्यंत बंदच ठेवण्यात येतील. सध्या हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांचे बिल व औषधांचे बिल याविषयी तक्रारी येतात. त्यामुळे प्रशासनाने काटेकोरपणे लेखापरिक्षण करण्याच्या सूचनाही वळसे पाटील यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *