महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । जगभरातील तब्बल ८५ देशात पसरलेल्या कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटने नव्याने टेन्शन वाढवलं आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या स्ट्रेनमधील रुग्ण आणि पहिल्या मृत्यूची सुद्धा नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध होणार आहेत. नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्व जिल्हे आता तिसऱ्या टप्प्यावरच राहतील. सोमवारपासून सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्यात येतील.
राज्यात ४ जूनला जिल्ह्यांची ५ गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडचा विचार करून सर्वात कमी दर असणारे जिल्हे पहिल्या गटापासून ते पाचव्या गटापर्यंत विभागणी करण्यात आली होती. त्या नियमांनुसार निर्बंध अधिकाधिक कठोर होत गेले. मात्र, आता नवीन नियमावलीनुसार सर्व जिल्हे पुढील आदेश येईपर्यंत या तिसऱ्या गटात राहतील.
‘डेल्टा व्हेरिएंट’ या कोरोनाच्या घातक प्रकाराने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट भारतासह जगातल्या एकूण ८५ देशांमध्ये पसरला आहे. हा व्हेरिएंट वेगाने संक्रमित होत असल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चिंता व्यक्त केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, अल्फा व्हेरिएंट १७० देशांमध्ये, बीटा व्हेरिएंट ११९ देशांमध्ये, गामा व्हेरिएंट ७१ देशांमध्ये आणि डेल्टा व्हेरिएंट ८५ देशांमध्ये पसरला आहे. डेल्टा अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. गेल्या दोन आठवड्यांत नवीन ११ देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे.
सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंटकडे बारीक लक्ष ठेवले जात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. डेल्टा हा अल्फा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने संक्रमित होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
भारतात सध्या देण्यात येत असलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसीही डेल्टा व्हेरियंटविरोधात खूप कमी प्रमाणात अँटिबॉडी निर्माण करतात, असे ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) वैज्ञानिकांनी प्राथमिक अहवालांतून म्हटलेले आहे. दरम्यान, भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असतानाच ‘डेल्टा प्लस’ या कोरोनाच्या नव्या प्रकाराने धोका निर्माण झाला आहे. ६० टक्के वेगाने हा डेल्टा प्लस संक्रमित होत आहे.