महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जून । 15 जूनपासून सुरू झालेल्या नव्या शैक्षणिक वर्षातही कोरोनाचा कहर सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताला असलेला धोका ओळखून सध्यातरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ऑनलाइनमुळे विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाची पुरेशी माध्यमे उपलब्ध नसल्याने यंदाही शिक्षण विभागाने अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
राज्याच्या अतिदुर्गम ग्रामीण भागात इंटरनेट, कनेक्टिव्हिटी, डिजिटल माध्यमांची वानवा असून आजही विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाशी जोडलेले नाहीत. गेल्या वर्षी सीबीएसईबरोबरच राज्य शिक्षण मंडळानेही अभ्यासक्रमात कपात केली होती. सीबीएसईने 30 तर राज्य मंडळाने 25 टक्के अभ्यासक्रम कमी पेला होता. यंदा मात्र सीबीएसईने अभ्यासक्रमात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विद्यार्थी सोशल मीडियात अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी करत आहेत. राज्यातील बहुतांश ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेचे पहिली ते नववीचे वर्ग अद्याप सुरू झालेले नाहीत. हे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाशी जोडलेले नाहीत. राज्यात शाळा सुरू होऊन दहा दिवस लोटले तरी विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवातदेखील झालेली नाही.
अभ्यासाच्या नियोजनाच्या दृष्टीने शिक्षण विभागाने अभ्यासक्रम कपातीचा निर्णय लवकर घ्यायला हवा. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही अभ्यासक्रम कमी करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीबीएसई बोर्डाद्वारे गतवर्षी जे विषय वगळले होते ते यावर्षी 2021-22मध्ये पुन्हा जोडले आहेत.