महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जून । Euro 2020 स्पर्धेत सोमवारी धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. फुटबॉलप्रेमींसाठी सोमवारचा दिवस हा रोमहर्षक सामन्यांची मेजवानी घेऊन आला. क्रोएशियानं माजी विश्वविजेत्या स्पेनला विजयासाठी झुंजवले, तर स्वित्झर्लंडनं विश्वविजेत्या फ्रान्सची पेनल्टी शूटआऊटमध्ये शिकार केली. १-३ अशा पिछाडीवरून क्रोएशियानं सामना ३-३ असा बरोबरीत आणला, परंतु भरपाई वेळेत स्पेननं दोन गोल करून ५-३ असा विजय पक्का केला. दुसरीकडे फ्रान्स विरुद्ध स्वित्झर्लंड सामना निर्धारीत वेळेत ३-३ असा बरोबरीत सुटला अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा हुकमी खेळाडू मॅबाप्पे याला गोल करण्यात अपयश आलं. स्वित्झर्लंडनं जिगरबाज खेळ करताना विश्वविजेत्यांना धक्का दिला.
पेड्रीच्या ( २० मि.) स्वयंगोलंनं क्रोएशियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पण, स्पेननं चतुराईनं खेळ करताना ३८व्या मिनिटाला पाब्लो सॅरेबियाच्या गोलने १-१ अशी बरोबरी मिळवली. ५७व्या मिनिटाला अझपिलिक्युएटा व ७७व्या मिनिटाला फेरान टोरेसनं गोल करून स्पेनला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. स्पेन हा सामना सहज जिंकेल असे वाटत असताना क्रोएशियाकडून पलटवार झाला. एम ऑर्सिचनं ८५व्या मिनिटाला व एम पॅसेलिचनं ९०+२ भरपाई वेळेत गोल करून सामना ३-३ असा बरोबरीत आणला. अतिरिक्त ३० मिनिटांच्या खेळात कमालीची चुरस पाहायला मिळाली. पण, मोराटा ( १०० मि.) व मायकेल ओयार्झाबाल ( १०३ मि.) यांनी सुरेख गोल करताना स्पेनचा ५-३ असा विजय पक्का करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला.