महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १जुलै । गेल्या दीड वर्षापासून मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. ‘कोरोना लढय़ा’त डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रंटलाइन कर्मचारी, पत्रकार यांच्यासह अनेक ‘कोरोना योद्धय़ां’नी आपल्या जिवाची बाजी लावली आहे. त्यामुळे कोरोनाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने आणि खबरदारीनेच वागले पाहिजे, असे सांगतानाच ‘‘कोरोना योद्धय़ांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका’’ असे आवाहन राज्याच्या टास्क पर्ह्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी केले.
मुंबईसह राज्यात कोरोना नियंत्रणात येत असला तरी संकट अजून पूर्णपणे टळलेले नाही. यातच संभाव्य तिसऱया लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागलेच पाहिजे, असे डॉ. संजय ओक म्हणाले. आता ‘मास्क ही राष्ट्रीय जबाबदारी’ म्हणून प्रत्येकाने स्वीकारायला हवी. शिवाय जी मिळेल ती लस घेतली पाहिजे. याशिवाय सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात धुणे या बेसिक गोष्टी प्रत्येकाने आतादेखील पाळल्या पाहिजेत. कोरोना व्हायरस आता आपला ‘स्ट्रेन’ बदलत असल्याचे समोर आल्यामुळे खबरदारी जास्त घ्यावी लागेल. निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे बेजबाबदारपणे गर्दी न करता खबरदारी घेतली पाहिजे. कठोर नियम, सर्वांसाठी लोकल निर्बंध हे निर्णय जनतेच्या भल्यासाठीच आहेत, हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे असेही डॉ. ओक म्हणाले.
तिसऱया लाटेसाठी प्रशासन सज्ज
कोरोनाच्या दोन्ही लाटांवर मुंबई-महाराष्ट्राने यशस्वीरीत्या मात केली आहे. आता रुग्णसंख्या नियंत्रणातही आहे. त्यामुळे तिसरी लाट येऊच नये अशी अपेक्षा आहे. तरीदेखील प्रशासनाच्या माध्यमातून तिसऱया लाटेसाठी प्रशासनाने पूर्ण तयारी ठेवली आहे. बेडचे नियोजन करण्यात आले आहे. तिसऱया लाटेत लहान मुलांना धोका जास्त असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे रुग्णालये, कोविड सेंटरमध्ये पीडिऑट्रिक वॉर्ड, आयसीयूचे नियोजन करण्यात आले आहे. खास निर्माण करण्यात आलेल्या पीडिऑट्रिक टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्व प्रकारची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे, असेही डॉ. ओक यांनी सांगितले.