कोरोनामुळे मेटाकुटीला आलेली जनता भाजपने केलेल्या महागाईमुळे त्रस्त – आमदार शेळके

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जुलै । वडगाव मावळ । कोरोनाच्या आसमानी संकटात होरपळून निघत असतानाच सतत इंधन दरवाढ करून केंद्र शासनाने लादलेल्या महागाईच्या संकटामुळे सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे. संकट काळात मदतीचा हात पुढे करण्याऐवजी भाजप सरकारने महागाईच्या आगीत ढकलले आहे, अशी टीका मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी शुक्रवारी केली.  

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. त्या प्रसंगी आमदार शेळके बोलत होते. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार सुनिल शेळके, तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे,जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, राष्ट्रवादी काँग्रेस महिला निरीक्षक कविता आल्हाट, महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, संघटनमंत्री नारायण ठाकर,अंकुश आंबेकर,गणेश ढोरे, दत्तात्रय पडवळ, बाळासाहेब पायगुडे, अशोक घारे, सुनिल भोंगाडे, सुनिल दाभाडे, कृष्णा दाभोळे, नगरसेविका वैशाली दाभाडे, ॲड.रुपाली दाभाडे, काळूराम मालपोटे, दिपक मानकर, अतुल राऊत,विशाल वहिले, आफताब सय्यद, नवनाथ चोपडे, अविनाश बधाले व इतर आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आमदार शेळके म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या व जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.या वाढत्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला फटका बसत आहे.जनता यामुळे त्रस्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर कमी होत असताना देखील भारतात मात्र इंधनाचे दर नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत. पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे, तर डिझेलचे भाव शंभरीच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहचले आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून त्यात सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे.

कोरोना संसर्गामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊन व अन्य निर्बंधामुळे अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडून देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे.जनता आर्थिक संकटात असताना केंद्र शासनाने मदतीचा हात देणे अपेक्षित होते. मात्र कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेला महागाईच्या आगीत ढकलण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे, अशी टीका आमदार शेळके यांनी केली.

•केंद्र शासनाने इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा हे जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा गारटकर यांनी दिला.
•भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत असून लोकशाही मानणारी जनता ही हुकुमशाही कदापि सहन करणार नाही. ‘अच्छे दिन’ हे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात लोकांचे जगणे कठीण करून टाकणाऱ्या भाजपला जनता घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे भेगडे म्हणाले.

यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *