उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे लक्ष

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या राज्यातील दोन्ही प्रमुख नेत्यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदांचं आयोजन केलं आहे.पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि मित्रपक्षांचे मंत्री या पत्रकार परिषदेत सहभागी होतील.

या परिषदेत पुढील दोन दिवसांत होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशन आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाऊ शकते.दरम्यान, आज राज्यात MPSC पास झालेल्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे वातावरण तापलं आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.

तसंच मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण यांसारख्या सध्याच्या ज्वलंत विषयांवर मुख्यमंत्री काय बोलणार याकडेही सर्वाचं लक्ष आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक आधी सायंकाळी साडेपाच वाजता होणार होती. पण नंतर तिची वेळ पुढे ढकलून सायंकाळी सहा वाजता होईल, असं कळवण्यात आलं आहे.

शक्यतो मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी नेते उपस्थित असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *