आयुष्याच्या मार्गावरून चालताना यश-अपयश हे येतच असते ; खचून जाऊ नका, परिस्थितीला सामोरे जा ! आयपीएस शिवदीप लांडे यांचा युवकांना सल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातल्या एका तरुणाने मृत्यूला कवटाळले. या घटनेनंतर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनीदेखील आपली प्रतिक्रिया देताना ‘‘आयुष्याच्या मार्गावरून चालताना यश-अपयश हे येतच असते, पण कुठल्याही परिस्थितीमुळे खचून जायचे नाही, परिस्थितीला चिकाटीने सामोरे जायचे’’ असे सांगत त्यांनी आपला खडतर अनुभव सांगितला आहे.

पुण्याचा स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर आयपीएस शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर त्यांचा अनुभव सांगितला आहे. केवळ नोकरीच्या परीक्षेत पराभव होणं म्हणजे अंत नाही. आयुष्य खूप सुंदर आणि आशावादी आहे. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात तेव्हा वाटतं, आता आपण थकलोय. पुढे काहीच दिसत नाही, परंतु अंधारानंतर प्रकाश दिसतो. मलादेखील असा अनुभव खूपदा आला आहे. हिंमत न हरता मी पुढे गेलो आणि आज मी इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. जर मला सरकारी नोकरी नसती तर मी अन्य काही रोजगार करून माझ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली असती. त्यामुळे कोणीही खचून न जाता जिद्दीने परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. विश्वास ठेवा, विजय आपलाच होतो असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *