![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्सनंतर आता आणखी एक भारतवंशीय महिला अंतराळ यात्रेवर जाणार आहे. या महिलेचे नाव ‘सिरिशा बांदला’ असे आहे. सिरिशा ही रिचर्ड ब्रेन्सन यांची स्पेस कंपनी ‘वर्जिन गॅलेस्टिक’चे अवकाश यान ‘वर्जिन ऑर्बिट’मध्ये बसून 11 जुलै रोजी अंतराळ प्रवासावर जाईल.
सिरिशा बांदला ही मूळ भारतीय महिला रिचर्ड ब्रेन्सन यांच्यासमवेत जाणार्या 5 अंतराळ यात्रींपैकी एक आहे. वर्जिन गॅलेस्टिक कंपनीच्या गव्हर्न्मेंट अफेअर्स अँड रिसर्च ऑपरेशनची उपाध्यक्ष म्हणून सिरिशा सध्या कार्यरत आहे. अवघ्या सहा वर्षांत सिरिशाने आपल्या शानदार कामगिरीच्या बळावर या कंपनीत मोठे पद प्राप्त केले.
सिरिशा ही अंतराळ प्रवासावर जाणार असल्याचे समजताच सोशल मीडियातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताच्या इतर भागाबरोबरच आंध्र प्रदेशात तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे. सिरिशा ही आंध प्रदेशातील गुंटूर येथील राहणारी आहे. तिने पर्ड्यू युनिव्हर्सिटीतून एअरोनॉटिकल/अॅस्ट्रॉनॉटिक इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएट पूर्ण केले आहे.
मेक्सिको येथील ‘विंग्ड रॉकेट शिप’मधून सिरिशा बांदला अंतराळात उड्डाण करणार आहे. या मोहिमेत ती ‘ह्युमन टेंडेड रिसर्च एक्सपिरियन्स’ ची इन्चार्जही असेल. म्हणजेच ती अंतराळ यात्रींवर अंतराळात कोणता परिणाम होतो, यावर संशोधन करणार आहे. सिरिशा टेक्सासमधील ह्यूस्टन येथे लहानाची मोठी झाली आहे.