महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आाणि एनसीपीचे नेते अनिल देशमुख सलग तिसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयासमोर गैरहजर राहिले आहे. देशमुख यांच्या जागी त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे बलयार्डमधील ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते. दरम्यान, अनिल देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची माहिती ईडीला सिंह यांनी दिली. तसेच न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रतिक्षा करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. अनिल देशमुख यांनी आपल्या याचिकेत अंमलबजावणी संचालनालयाची कठोर कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने देशमुख यांना तिसऱ्यांदा समन्स बजावले होते. यापूर्वी ईडीने शनिवारी 11 वाजता आपल्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, त्यादिवशी देशमुख हे स्वत: न जाता आपल्या वकीलाला पाठवले होते. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा अनिल ईडीसमोर गैरहजर राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर देशमुख हे अटक टाळण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्या महिन्याला 100 कोटी रुपये वसूली करण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ईडी देशमुख यांची याप्रकरणी चौकशी करत आहे.
सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी करण्याची मागणी – वकील
अंमलबजावणी संचालनालयाची कठोर कारवाई थांबवण्यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले आहे. त्यासोबतच संबंधित याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणीही सिंह यांनी यावेळी केली आहे.
ईडी कारवाईचा आधार सांगत नाहीये – इंद्रपाल सिंह
अनिल देशमुख यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय कोणत्या आधारावर कारवाई करत आहे याचा आधार सांगत नसल्याचे त्यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी सांगितले आहे. त्यासोबतच देशमुख यांनी ईडीला विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर आतापर्यंत प्राप्त झाले नाही. देशमुख यांची प्रकृती ठीक नसल्याने ते चौकशीला हजर राहू शकत नाही असे एका पत्रात म्हटले होते. त्यांनी ही चौकशी एका व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंगव्दारे करण्याची मागणी त्यावेळी केली होती.