फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून पुणे विभागातील रेल्वे स्थानकांवर साहेसात हजार प्रवाशांवर कारवाई

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या दुष्टचक्रामुळे रेल्वेची आर्थिक चाके रुतली असताना, फुकट्या प्रवाशांनी मात्र रेल्वे प्रशासनाला हैराण करून सोडले आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होऊन रेल्वेसेवा पूर्वपदावर येताच जून महिन्यात मध्य रेल्वे पुणे विभागाच्या विविध रेल्वे स्थानकांवर तब्बल सात हजार 331 प्रवासी फुकटात प्रवास करताना आढळले आहेत. या फुकट्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने 29 लाख 29 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मध्य रेल्वे पुणे विभागात बहुतांशी एक्प्रेस गाड्या धावत आहेत. या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ‘आरटीपीसीआर’ चाचणी केलेले कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय आरक्षित तिकीट असल्याशिवाय प्रवास करता येणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. तरीही हजारो प्रवासी चोरीछुपे रेल्वे बोगीत चढून विनातिकीट प्रवास करीत असल्याचे आढळून येत आहे. अनेक प्रवासी हे सामान वाहतुकीचे तिकीटही न काढताच अवजड साहित्य घेऊन प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मे महिन्यात चार हजार 347 प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले होते. त्यावेळी रेल्वेने त्यांच्याकडून 17 लाख 28 हजारांचा दंड वसूल केला होता. मात्र, जून महिन्यात तब्बल सात हजार 331 प्रवासी विनातिकाटाचे प्रवास करताना आढळले. या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने 30 लाखांचा दंड वसूल केला.

मध्य रेल्वे पुणे विभागाच्या प्रबंधक रेणू शर्मा, अपर मंडल रेल प्रबंधक सहर्ष बाजपेयी यांच्या आदेशानुसार वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, श्याम कुलकर्णी, सहायक वाणिज्य प्रबंधक एस.व्ही.एन. सुभाष यांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासणी पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *