सीबीएसई : दहावी-बारावीसाठी आता वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । कोरोना महामारीमुळे यंदाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द कराव्या लागल्यानंतर सीबीएसईने आता आगामी शैक्षणिक सत्र म्हणजे २०२१-२२ साठी पूर्वतयारी केली आहे. सोमवारी सीबीएसईने २०२१-२२ या वर्षात इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतसाठी स्पेशल असेसमेंट स्कीमची (मूल्यांकन पद्धत) घोषणा केली. त्यानुसार, १०वी व १२वीत १००% अभ्यासक्रमावर आधारित पारंपरिक बोर्ड परीक्षेऐवजी टर्म-१ आणि टर्म-२ या नावाने वर्षातून दोन परीक्षा घेतल्या जातील. प्रत्येक परीक्षेत ५०% अभ्यासक्रमातूनच प्रश्न विचारले जातील. म्हणजे ५०% अभ्यासक्रम टर्म-१ मध्ये व उर्वरित ५०% टर्म-२ मध्ये विचारला जाईल.

दोन्ही टर्म परीक्षांचे पेपर बोर्डच तयार करेल. टर्म-१ चा पेपर बहुपर्यायी प्रश्नावर आधारित असेल. तो ओएमआर शीटवर असेल. इतकेच नव्हे तर ऑनलाइन शिक्षणासाठी अभ्यासक्रम आणखी सयुक्तिक केला जाईल. शाळांचे अंतर्गत मूल्यांकन अधिक विश्वासार्ह करण्यासाठी पावले उचलली जातील. कोरोनामुळे वाढत्या अनिश्चिततेकडे पाहता सीबीएसईने असेसमेंटच्या चार संभाव्य परिस्थितीही ठरवल्या आहेत. परिस्थिती पूर्णपणे अनुकूल राहिल्यास टर्म परीक्षा बाहेरील पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत वा बाह्य केंद्रांवर होऊ शकतात.

बिकट परिस्थितीत पुढील संपूर्ण सत्रात शाळा बंदच राहिल्यास दोन्ही टर्मचे पेपर विद्यार्थ्यांना घरूनच देता येतील. पुढील पूर्ण सत्रादरम्यान कोरोना महामारीची स्थिती कशी असेल हे पूर्णपणे अनिश्चित आहे. ही अनिश्चितता पाहता आता सीबीएसईनेही पूर्ण तयारी केली आहे. ४ प्रकारच्या परिस्थितीसाठी निकालाचा फॉर्म्युला वेगवेगळा बनवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *