महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची ब्ल्यूप्रिंट तयार झाली आहे. मंगळवारी ८ राज्यपालांच्या नियुक्तीसोबतच त्याची भूमिकाही ठरली. बुधवारी संध्याकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. सूत्रांनुसार, बदलांनंतर हे आजवरचे सर्वात युवा मंत्रिमंडळ असेल. कॅबिनेटमध्ये आरोग्यसारख्या क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश केला जाऊ शकतो. सूत्रांनुसार काही दिग्गज मंत्र्यांना पुन्हा संघटनेत पाठवले जाऊ शकते. ८ ते १२ महिन्यांत निवडणुकांच्या राज्यांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाईल. काही मंत्र्यांचा खातेपालटही हाेऊ शकतो. निवडणुकांकडे पाहता जातीय व प्रादेशिक समीकरणेही साधण्याची तयारी आहे. दरम्यान, मध्य प्रदेशहून राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया व महाराष्ट्रातून नारायण राणे तसेच आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल दिल्लीत दाखल झाले. सूत्रांनुसार, महिला व बाल विकास मंत्रालय आणि वित्त मंत्रालयातही बदल शक्य आहेत. दुसरीकडे अनुराग ठाकूर, अर्जुन राम मेघवाल यांना बढती मिळू शकते. कॅबिनेट विस्ताराआधी ‘सहकारातून समृद्धी’ व्हिजन साकारण्यासाठी कृषी मंत्रालयातून वेगळे करून प्रथमच ‘सहकारिता मंत्रालय’ स्थापण्यात आले आहे. ते सहकारी क्षेत्राला मजबूत करण्यासाठी स्वतंत्रपणे प्रशासकीय, कायदेशीर आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
नड्डांच्या घरी संध्याकाळी उशिरापर्यंत खलबते : मंगळवारी हिमाचलहून दिल्लीत परतलेल्यानंतर भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटण्यासाठी संध्याकाळी साडेपाच वाजता भाजप संघटनमंत्री बी.एल. संतोष दाखल झाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व राजस्थानच्या माजी सीएम वसुंधरा राजेंशीही त्यांची भेट झाली. दुसरीकडे, बंगालमधील भाजप खासदार एस. ठाकूर, कर्नाटकचे ए.नारायणसामी, मणिपूरचे आर.आर. सिंह, यूपीचे सकलदीप राजभर, अनिल बलूनी, सुधांशु त्रिवेदी, सुशील मोदी, अश्विनी वैष्णव, जी.व्ही.एल. नरसिंहराव यांचीही नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.