महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । मुंबईत कोरोना रोखण्यात धारावीने आघाडी घेतली असून दुसऱया लाटेदरम्यान आज पाचव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही. धारावीबरोबर मध्य मुंबईतील वर्दळीचे भाग असणाऱया दादर आणि माहीममध्येही रुग्णसंख्या घटली असून दादरमध्ये मंगळवारी एकही रुग्ण सापडला नव्हता.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि मुंबईतील सर्वात मोठी दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीने कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱया लाटेवरही नियंत्रण मिळवले असून धारावीत आज पाचव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही. मात्र, सक्रिय रुग्णांची संख्या स्थिर आहे. धारावीत 22 सक्रिय रुग्ण आहेत. धारावीत याआधी 14 आणि 15 जूनला सलग दोन वेळा एकही रुग्ण सापडला नाही, तर 23 जून आणि 4 जुलैला चौथ्यांदा एकही रुग्ण सापडला नाही.
कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान दादरमध्ये मंगळवारी पहिल्यांदा एकही रुग्ण सापडला नाही. मात्र, दादरमध्ये आज 15 रुग्ण सापडले, तर दादरमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या अजूनही शंभरच्या पुढे आहे. माहीममध्येही रुग्णसंख्या एक आकडी असली तरी त्यात चढउतार होत आहेत. माहीममध्ये आज 5 रुग्ण सापडले तर सक्रिय रुग्णांची संख्या शभरच्या आत आहे.