महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । ऐतिहासिक वेम्बली मैदानात युरो चषकाचा (Euro Cup 2020) सेमी फायनलचा सामना इंग्लंड आणि डेन्मार्क (England vs Denmark) या दोन संघामध्ये पार पडला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्य़ा सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने (Harry Kane) नावाला साजेशी खेळी करत अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल लगावला. ज्याच्या मदतीने इंग्लंडने 2-1 च्या फरकाने सामना खिशात घालत अंतिम सामन्यात धडक घेतली. इतिहासात पहिल्यांदाच युरो चषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने अशी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे 1966 नंतर पहिल्यांदाच अशा मोठ्या स्पर्धेत इंग्लंड अंतिम सामन्यात पोहोचली आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडसमोर इटलीचे आव्हान असेल. (In Euro Cup England Win over Denmark in Semi Final and enters in Finals With Italy)
🤔🤔🤔
— UEFA EURO 2020 (@EURO2020) July 7, 2021
कर्णधार केनचा गोल आणि इंग्लंड विजयी
पहिल्या हाल्फनंतर 1-1 स्कोर असताना दुसऱ्या संपूर्ण हाल्फमध्ये इंग्लंडला एकही गोल करता आला नाही. दोनही संघानी काही प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. अखेर 90 मिनिटं झाल्यानंतर अतिरिक्त वेळ देण्यात आला. त्यावेळ 103 व्या मिनिटाला इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनला डेन्मार्कच्या एका चूकीमुळे पेनल्टी मिळाली. तिचा वापर करत त्याने गोल करण्याचा प्रयत्न केला पण डेन्मार्कच्या गोलकिपरने गोल रोखला खरा पण बॉलला हातात ठेवू न शकल्याने केनने पुन्हा किक करत बॉल गोलपोस्टमध्ये टाकला 2-1 ने संघाला विजय मिळवून दिला.
फायनलमध्ये इंग्लंड-इटली आमने सामने
याआधी सेमीफायनलच्या दुसऱ्या लढतीत इटलीने चुरशीच्या झालेल्या सामन्यात स्पेनला (Italy vs Spain) मात देत अंतिम सामना गाठला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दोन्ही संघानी 1-1 गोल केला. त्यामुळे विजयी कोण हे ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आले, ज्यात इटलीने 4-2 च्या फरकाने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यामुळे आता इंग्लंड विरुद्ध इटली (England vs Italy) असा युरो चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे.