![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने नागरिक त्रस्त आहेत. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसत आहेत. त्यातच आता सर्वसामान्यांना आणखी दरवाढ सोसावी लागणार आहे. महानागर गॅस लिमिटेडने दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा आणखी फटका बसणार आहे. पेट्रोलने शंभरी पार केली असून महानगर गॅस लिमिटेडच्या दरवाढीने सीएनजीने पन्नाशी पार केली आहे.
गॅस पाइपलाईन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) दरवाढ केली आहे. एमजीएलच्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी ) किंमतीत 2.58 रुपये प्रतिकिलो तर घरगुती गॅसच्या (पीएनजी) किंमतीत 0.55 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर ही दरवाढ लागू झाली आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
या दरवाढीमुळे मुंबई आणि आसपासच्या सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या सर्व करांसह सुधारित वितरित किंमती सीएनजी 51.98 रुपये प्रति किलोग्राम आणि पीएनजी 30.40 रुपये एससीएम (स्लॅब 1) आणि 36.00 एससीएम (स्लॅब 2) अशा असतील. एमजीएलची सीएनजीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे 67 टक्केआणि 47 टक्के इतकी बचत होते. तर पीएनजीमुळे घरगुती एलपीजीच्या तुलनेत 35 टक्क्यांची बचत होते, असे महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात आले.