अनलॉक:हॉटेल्स, दुकानांची वेळ वाढण्याची शक्यता; राज्यात कोरोना निर्बंध लवकर शिथिल होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । राज्यात पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने कोरोनाचे निर्बंध दूर होऊ शकतात. ते कसे हटवावेत यासंदर्भातील अहवाल कोरोना टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर निर्णय घेतील.

राज्यात टप्प्याटप्प्याने सर्व आस्थापने मोठ्या टक्केवारीने खुली करण्याचे नियोजन आहे. दुकानांची वेळ वाढवण्याबरोबरच रेस्टॉरंट व हाॅटेलमधील उपस्थितीची मर्यादाही शिथिल केली जाणार आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांना उपस्थितीमध्ये प्राधान्य दिले जाऊ शकते. सामान्यांसाठी मुंबईतील लोकल सुरू करण्याचा निर्णय मात्र लगेच घेतला जाणार नाही. पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जातील. यात रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची वेळ रात्री १० पर्यंत केली जाईल. तसेच ५० टक्क्यांची मर्यादाही शिथिल केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असावेे. तसेच लसीकरण झालेल्या ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देण्यास प्राधान्य देण्यासंदर्भात विचार सुरू आहे.

हॉटेलचालक, व्यापाऱ्यांचा आघाडी सरकारवर दबाव
राज्यात रुग्णसंख्या घटत असूनही निर्बंध लादल्याने व्यापारी, हाॅटेलचालकांमध्ये नाराजी आहे. दुकाने, प्रतिष्ठाने यांची वेळ वाढवण्यासाठी तसेच हॉटेलमधील ग्राहकांचे प्रमाण वाढवण्यासाठी हाॅटेल व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार यांचा दबाव वाढत आहे. त्यामुळेच सरकार हा निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा विचार करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *