पुणेकरांना दिलासा नाहीच ; निर्बंध कायम, शैक्षणिक संस्था 31 जुलैपर्यंत बंदच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुलै । पुणे महापालिकेच्या हद्दीत सध्या लागू असलेले नियमच कायम राहणार असल्याचं नव्या आदेशात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात (Pune Corona Virus) तेच निर्बंध (Lockdown) कायम ठेवण्यात आले आहेत. येत्या आठवड्यातही पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत. शनिवार, रविवार विकेंडला अत्यावश्यक सुविधा वगळता कडक निर्बंध लागूच राहणार आहेत. तसंच पर्यटन स्थळी बंदीच असेल.

या निर्बंधानुसार व्यापारी,हॉटेल व्यावसायिक यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुणे शहरात positivity दर 5 टक्क्यांच्या खालीच आहे मात्र असं असूनही बंधनं शिथील करायला प्रशासन तयार नाही. आज पालकमंत्री अजित पवार हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी कोरोनाबाबत आढावा बैठक घेतील. मात्र पुणे पालिकेनं आधीच आदेश काढून निर्बंध कायम राहतील असे आदेश काढले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर निर्बंध शिथील होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागात काही तालुक्यात 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरू झाले असले तरी पुणे शहरात सर्व शैक्षणिक संस्था 31 जुलै पर्यंत बंदच राहतील असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात निर्बंध जैसे थे राहणार आहे. दुकानांची सकाळी 8 ते दुपारी 4 ची मुदत संपल्यावरही फेरीवाले, हातगाडीवाले फिरतायत त्यांना फिरू देऊ नका. तसंच 5 वाजता संचारबंदी लागू झाल्यानंतर जर दुकाने उघडी राहिली, नागरिक फिरताना दिसले तर कडक कारवाई करा असे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर दिले आहेत.

पुण्यात काय सुरू, काय बंद?

पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील.

मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.

रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.

अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी

कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत

उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.

खासगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत.

अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने.

लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणं आवश्यक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *