देशात सापडला दोन वेरिएंटची लागण झालेला पहिला रूग्ण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । कोरोना व्हायरस ज्याप्रमाणे रूप बदलतोय त्यानुसार सर्वांचं टेंशन अधिकच वाढलं आहे. अशातच गुवाहाटीवरून अजूनच चिंता वाढवणारी एक घटना समोर आली आहे. गुवाहाटीमध्ये एका महिला डॉक्टरला डबल वेरिएंटचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. एकाच वेळी दोन कोरोना वेरिएंट संक्रमण झाल्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याचं मानलं जातंय.

मुख्य म्हणजे या महिला डॉक्टरने लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती आहे. त्यानंतर या डॉक्टरची तपासणी केली असता तिला दोन वेरिएंटचं संक्रमण झाल्याचं समोर आलंय. डॉक्टरच्या सॅम्पलमध्ये अल्फा आणि डेल्टा हे वेरिएंट सापडले आहेत.

जगभरातील पहिलं असं प्रकरण बेल्जियममध्ये आढळून आलं होतं. या ठिकाणी एका 90 वर्षांच्या महिलेला एकाच वेळी दोन वेरिएंटचा संसर्ग झाला होता. या महिलेला अल्फा आणि बीटा या दोन व्हेरिएंटचा संगर्ग झाला होता. दरम्यान यांनंतर या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या वृद्ध महिलेने कोरोना प्रतिबंधक लसीचा एकंही डोस घेतला नव्हता.

इंडिया टुडेशी बोलताना आसामच्या डिब्रूगड जिल्ह्यातील ICMR-RMRCचे नोडल अधिकारी डॉ. विश्वज्योती बोरकाकोटी यांनी एका महिला डॉक्टरला दोन कोरोना वेरिएंटने संक्रमित झाल्याचं सांगितलं आहे. ते या प्रकरणाला भारतातील पहिलं प्रकरण मानत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, या महिला डॉक्टरला फार सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. मात्र आता त्यांची प्रकृती ठीक आहे. प्रकृती ठीक असल्याने त्यांना रूग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *