महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. बाणूरगड येथील कार्यक्रमात स्वराज्यामधल्या योद्ध्यांची स्मारकं झाली पाहिजेत, पण ती नुसती स्मारकं न राहता प्रेरणास्थानं बनली पाहिजेत अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
खानापूर तालुक्यातील बाणूरगड (जि.सांगली) येथे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोमवारी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सदाभाऊ खोत असून भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर, जि. प. अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जि.प उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर, उपसरपंच कांताताई गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, दीर्घकाळ परकियांची राजवट आणि अनागोंदी अनुभवणार्या महाराष्ट्राला एका चैतन्यसूत्रात बांधण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. महाराष्ट्र संस्कृतीला आत्मभान आले, ते या स्वराज्यामुळेच. युगप्रवर्तक शिवछत्रपतींनी एक आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. अर्थातच त्यांच्या राजवटीत गुप्तहेरांचे जाळे अतिशय भक्कम होते. सुमारे तीन ते चार हजार गुप्तहेरांचे नेतृत्त्व बहिर्जी नाईक यांनी केले. बहिर्जी नाईक यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या होत्या.स्वराज्य उभा करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. खर्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज युगपुरूष होते. समाजातील प्रत्येक घटकाशी सामाजिक बांधिलकी जोपासत त्याला राजव्यवस्थेमध्ये महाराजांनी समान न्याय दिला. शिवकालीन गुप्तहेरांची एक भाषा बहिर्जी नाईक विकसित केली. गुप्तहेरांचे संभाषण कौशल्य हे वेगळ्या पध्दतीचे होते. त्यावेळी आजच्यासारख्या आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. परंतु, गुप्तहेर खात्याची एक वेगळी भाषा बहिर्जी नाईक यांनी स्वतः विकसित केली होती. त्या फक्त त्यांच्या गुप्तहेरांना कळत होत्या. त्याकाळात केवळ संशयावरून हत्या केली जात असे, परंतु त्याकाळात अतिशय पक्की खबर बहिर्जी नाईक काढून आणत असत. त्यांना कधीही पकडता आले नाही. स्वराज्याच्या सेनानीचे हे अतिशय सार्थ स्मारक ठरेल.