अलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी तातडीने बोला – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । कोल्हापूर, सांगली भागातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा करून समन्वय साधला पाहिजे,असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला ट्विटरच्या माध्यमातून दिलाय.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र विशेषतः: कोकणातील महाडनजीक घडलेल्या घटना पाहता तातडीची मदत करावी. तसेच नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत द्यायला हवी. पिण्याचे पाणी, अन्न, कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा या बाबी प्राधान्यक्रमात असल्याच पाहिजेत, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागात सातत्याने येणारी संकटे पाहता दूरगामी विचार राज्य सरकारने करण्याची गरज आहे. तळिये या गावात घरे नव्याने पण सुरक्षित ठिकाणी बांधून सर्व नागरी सुविधा नागरिकांना निर्माण करून द्याव्यात. असे करताना धोकादायक क्षेत्राबाहेर हे पुनर्वसन असावे, अशी सूचना त्यांनी केली.

कोकणाची भौगोलिक स्थिती आणि सातत्याने येणारी संकटे पाहता कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करावी. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही फडणवीस यांनी ट्विटमधून केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *