पाऊसाचा जोर कमी ; २८ पर्यंत राज्याला दिलासा !

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । पाऊस सध्या तरी कमी झाला आहे. तुर्तास २८ जुलै पर्यंत राज्याला दिलासा मिळणार आहे. राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातार्‍यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात गेल्या तीन ते चार दिवसांपासून धुमाकूळ घालत असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. शनिवारी दिवसभर उघडीप होती. पुढील चार ते पाच दिवस पावसाची विश्रांती असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागांना दिलासा मिळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, कोकणसह पालघर, ठाणे, पुणे आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी रविवार ते बुधवार या कालावधीत पावसाची शक्यता आहे. राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोकणसह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाने हाहाकार माजला होता.

त्यामुळे कोकणातील चिपळूण, कोल्हापूर, सांगली या भागातील नद्यांना महापूर आल्यामुळे या भागात पुराचे पाणी शिरले. तसेच काही भागांत पावसामुळे दरडी कोसळल्याने मनुष्यहानी झाली. इतरही अतोनात नुकसान झाले. आता मात्र हा पाऊस कमी झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, या भागांत ‘यलो अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे. परिणामी, रविवार ते बुधवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

28 जुलै रोजी बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेला कमी दाबाचा पट्टा आता कर्नाटकच्या किनारपट्टीकडे सरकला आहे. त्यामुळेच राज्यातील पाऊस कमी झाला आहे. सध्या कर्नाटकच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. तर 28 जुलै रोजी बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *